अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शहरातील ताडेपुरा चौफुली (धरणगाव रोड) तसेच पारोळा रोडवरील सप्तशृंगी माता मंदिराजवळ मुख्य रस्त्यालगत असलेले पाण्याचे वॉल. गेल्या काही वर्षांपासून उघड्या अवस्थेत असल्याने वाहनधारक व पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.रस्त्याच्या अगदी लगत असलेल्या या वॉलवर कोणतेही संरक्षक झाकण किंवा सुरक्षित कव्हर बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा उघडा वॉल वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी यापूर्वीही अनेक अपघात घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांसाठी

हा उघडा वॉल अधिक धोकादायक ठरत असून, अचानक वाहनाचा तोल गेल्यास गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. चारचाकी वाहनांसह पादचाऱ्यांनाही या ठिकाणी धोका निर्माण झाला आहे.

संभाव्य दुर्घटना व जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने या वॉलवर मजबूत व पक्के झाकण बसवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नगरपरिषद अथवा संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.

