अमळनेर/ आबीद शेख

रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने शहरात स्थायिक झालेल्या नांद्री येथील तरुण सुपुत्रांनी आपल्या जन्मभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक सुंदर पुढाकार घेतला आहे. अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर एकत्र येत या तरुणांनी ‘नांद्री विकास मंच’ची स्थापना करत गावाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प सोडला.
याच संकल्पाचा भाग म्हणून, देशात सुरू असलेल्या ‘सेवा सप्ताहा’चे औचित्य साधून ३ ऑक्टोबर रोजी मंचाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद शाळा, नांद्री येथील सुमारे ४० गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शालेय उपयुक्त साहित्य आणि खाऊचे वाटप केले.शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा.

अशी भावना व्यक्त करताना मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही याच शाळेत घडलो आणि आज बाहेरच्या जगात उभे आहोत. लहानपणी शिक्षकांनी दिलेली शिकवण होती की, “आपण किती शिकलो यापेक्षा आपल्या शिक्षणाचा समाजाला किती उपयोग होतो हे महत्त्वाचे आहे. त्याच विचाराने प्रेरीत होऊन आम्ही गावातील शेती, पाणी, स्वच्छता आणि व्यसनमुक्ती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने काम करणार आहोत.”

यापुढे जलसंधारण आणि ग्रामविकासाचा ठोस निर्धार करत
गावात निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मंचाने पुढचे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. येत्या काळात सीएसआर फंड, लोकवर्गणी आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून नाला खोलीकरण व पाणलोट बंधारे बांधण्याचे उपक्रम राबवणार असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
धावपळीच्या आणि स्वार्थी युगात आपल्या मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी एकत्र आलेल्या या तरुणांचा हा उपक्रम केवळ स्तुत्यच नाही, तर इतर गावांतील तरुणांसाठीही एक नवा आदर्श आणि प्रेरणा देणारा ठरत आहे.

