अमळनेर/आबीद शेख

अमळनेर, : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना, विकासकामे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अमळनेर येथे ‘प्रगतिशील महाराष्ट्र २०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार स्मिता उदय वाघ यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशन या संस्थेच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
बुधवार, दि. ७ ऑक्टोबरपासून अमळनेर येथील कलारंग मंगल कार्यालयात या प्रदर्शनाला सुरुवात होणार असून, जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी पत्रकार परिषदेत केले.

दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. यापूर्वी जळगाव येथील जि. एस. ग्राउंडवर या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्याच धर्तीवर अमळनेर आणि परिसरातील नागरिकांनाही या प्रदर्शनाचा लाभ मिळावा, या उद्देशाने यंदा अमळनेरमध्ये आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात कृषी व फलोत्पादन, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग व विमा, आरोग्य, वाणिज्य व व्यापार, ऊर्जा व पर्यावरण, शिक्षण, ग्राहक जागरूकता, माहिती व दळणवळण तंत्रज्ञान, वाहतूक, रेल्वे, पर्यटन, हस्तकला व हातमाग, रसायने व खते अशा विविध क्षेत्रांतील केंद्र व राज्य सरकारच्या योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि विकासकामांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
शासनाच्या विविध विभागांची माहिती नागरिकांना देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारमधील विविध विभागांचे आयएएस अधिकारी, संचालक तसेच तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ देशाच्या विविध भागांतून प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक आणि उद्योजकांसाठी हे प्रदर्शन विशेष उपयुक्त ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी केले.
७ ऑक्टोबरला सकाळी ९.३० वाजता उद्घाटन
या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता होणार आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते तसेच जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक फ्रेंड्स एक्झिबिशन अँड प्रमोशन संस्थेचे चेअरमन आनंद पाटील यांनी दिली.
पत्रकार परिषदेला अखिला श्रीनिवासन, दीपकसिंह मेहता, साक्षी सैनी, दत्ता थोरें आणि संतोष पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

